राज्यात कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी कोरोनाचे संकट कायम आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही उत्सवावर करोनाचं विघ्न कायम आहे. त्यामुळे सरकारकडून गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून, सार्वजनिक आणि घरात विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तींसंदर्भात काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी ४ फूटांची, तर घरगुती गणेशमूर्ती २ फुटांची असावी अशी मर्यादा घालून देण्यात आली आहे.
यंदा गणेशोत्सव जल्लोषात आणि नेहमीच्या थाटात साजरा होईल, अशी आशा होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं त्यावर पाणी फेरलं. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी धोका ओळखून राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली निर्धारित केली आहे.
अशी आहे गणेशोत्सवाची नियमावली
१) गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित.
२) कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.
३) सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूट असावी
४) विसर्जन कृत्रिम तलावात करावे, शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी.
५) नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी.
६) शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी.
७) सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत
८ आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी.
९) नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्किंग, वेबसाईट, फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन
देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी.
१०) गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी