केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. अमित शाह यांनी म्हटले की, शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे प्रमुख आहेत. देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचं काम कुणी केलंय तर ते शरद पवार यांनी केलं आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, ज्या #भटकती_आत्मा ने भाजपची लोकसभेला धूळधाण केली तोच आत्मा आज #महाराष्ट्र_धर्माचे रक्षण करणारा #सरगणा होणार हे लक्षात आल्यानेच आज भाजपा अधिवेशनात गृहमंत्री अमित शाह साहेबांसह सर्वांनी पवार साहेबांवर टीका केली.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, भ्रष्टाचाराचे जातीवंत आरोप असणाऱ्या मंडळींसोबत मांडीला मांडी लावून बसणाऱ्या, भ्रष्टाचाराचे अनभिषिक्त चक्रवर्ती सम्राट असलेल्या भाजपला भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? समृध्दी महामार्ग प्रकल्पाच्या दलालीतून आलेला पैसा #गुजरात विधानसभा निवडणुकीला वापरला गेला का? याचं उत्तर लाडक्या खुर्चीसाठी आपली (जुन्या भाजपची) तत्वे-निष्ठा गहाण ठेवून भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या नव्या भाजपने द्यावं. असे रोहित पवार म्हणाले.