मुंबई : राज्यात कोरोनाचा (Corona Virus) आलेख दिवसेंदिवस वाढतच असून प्रशासानाने कोरोनाशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मास्क सक्तीबाबत विचार केला जात आहे. तसेच, आवश्यक त्या उपाययोजनाही सुरु करण्यात आल्या आहेत. अशातच शाळा (School) सुरु होणार की नाही अशी संभ्रमावस्था पालक आणि विद्यार्थी वर्गात निर्माण झाली आहे. यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, राज्यातील शाळा नियोजित वेळापत्रकारनुसारच सुरू होणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. कोरोनामुळे शाळेच्या वेळापत्रकात कोणताही बदल केलेला नाही. सर्व काळजी घेऊनच शाळा सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले आहे.
विदर्भ वगळता राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू होणार आहेत. तर, विदर्भातील शाळा 29 जूनपासून सुरू होणार आहे. तर, शाळेत विद्यार्थ्यांना मास्क घालणे अनिवार्य नसेल. तसेच, शाळांसाठीही नवीन एसओपी जारी केली असल्याची माहितीही त्यांनी दिली
दरम्यान, राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थी-पालकांना निकालाची प्रतिक्षा लागली आहे. याच संदर्भात वर्षा गायकवाड यांनी बारावीचा निकाल पुढील आठवड्यात लागणार तर दहावीचा त्यानंतर 15 दिवसांनी लागणार असल्याची माहिती दिली. यानुसार बारावीचा निकाल पुढील आठवड्यात 6 किंवा 7 तारखेला घोषित होण्याची शक्यता आहे. तर दहावीचा त्यानंतर 15 दिवसांनी म्हणजेच 23 किंवा 24 तारखेला लागणार असल्याची शक्यता आहे.