राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल केले जात आहेत. सोमवारी झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे उपाहारगृहांना रात्री 12 वाजेपर्यंत तर दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
याविषयीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जारी करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे सिनेमागृहे, चित्रपटगृहांपाठोपाठ राज्यातील अॅम्युझमेंट पार्कही 22 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार आहेत.
कोरोना टास्क फोर्सच्या झालेल्या बैठकीत राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्णसंख्या कमी होताना दिसते. 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाटय़गृहे यांनाही सुरू करीत आहोत. उपाहारगृहे व दुकाने यांच्या देखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.