निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Election) आज (31 मे) प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत जाहीर होणार आहे. मुंबईसह (Mumbai) राज्यातील 14 महानगरपालिकांच्या (BMC Election 2022) प्रभागांसाठी आज आरक्षण (Reservation) सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवारांसह संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागून आहे. आरक्षणाची सोडत आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात होणार आहे. सकाळी ११ वाजता प्रभागांच्या सोडत निघणार असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण डोंबिवलीसह 14 महापालिकांची आरक्षण सोडत आज मुंबईत वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडणार आहे. या सोडतीवर सर्व पक्षांतील इच्छुक, संभाव्य उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे. महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा हा कार्यक्रम ३१ मे ते १३ जूनपर्यंत सुरू राहणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यातील १४ महापालिकांना ३१ मेपर्यंत आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईत यंदा नऊ प्रभागांची वाढ होऊन २२७ वरून २३६ प्रभाग झाले आहेत. त्यामुळे यंदा आरक्षणात काही जागांची वाढ होऊ शकते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण आहे. पालिकेत या आरक्षणात महिला अनुसूचित जाती आणि जमाती व सर्वसाधारण महिला यांच्यासाठी सोडत काढली जाणार आहे. यानंतर आरक्षणावर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी मुंबईतील २४ प्रभागांमध्ये यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेतील प्राधान्यक्रम असा राहणार
प्राधान्यक्रम १ – मागील तीन निवडणुकांत महिलांना आरक्षण नसल्यास यावेळी महिलांना प्राधान्य
प्राधान्यक्रम २ – २००७ च्या निवडणुकीत महिलांना राखीव होता, पण २०१२ आणि २०१७ मध्ये नसल्यास महिलांना प्राधान्य
प्राधान्यक्रम ३ – २००७ मध्ये राखीव होता मात्र २०१२ व २०१७ मध्ये नसल्यास आरक्षणासाठी प्राधान्य देण्यात येईल.
महिला–पुरुष ५०-५० टक्के
एकूण वॉर्ड – २३६ (१५ वॉर्ड अनुसूचित जाती, २ वॉर्ड अनुसूचित जमाती)
महिला – ११८ पुरुष – ११८