बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. परिणामी भारतीय हवामान विभागातर्फे मुंबई, रायगड, ठाणे, पालघरमध्ये उद्या(शुक्रवारी) अतिवृष्टीचा (रेड अलर्ट ) इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी देखील धोक्याच्या ठिकाण जाऊ नये अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्याही पद्धतीची नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) दोन तुकड्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याच्या राजधानीत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग सुरुच आहे. मुंबईत काही ठिकाणी 200 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच, मुंबईत 7 आणि 8 जुलै रोजी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई- ठाण्यात रात्रीपासून पावसाची रिपरिप होतीच मात्र पहाटेपासून पावसानं जोर धरायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर अधून मधून जोरदार वारे 40 ते 50 किमी प्रति तास ते 60 असे वेगाने वाहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच उद्यासाठी मुंबईसह पालघर ठाणे आणि रायगडमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे.