राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरस्वती मातेवरून केलेल्या विधानानंतर राजकीय व सामाजिक क्षेत्रात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर सिडको भागातील भुजबळ फार्म या भुजबळांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात येऊन रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे.
छगन भुजबळ यांनी काही दिवसांपुर्वी सरस्वती देवीसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. भाजपने भुजबळांच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलनही केलं. त्यामुळे, भुजबळांच्या विरोधातील आंदोलन आणखी उग्र होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
दोन दिवसांपासूनच पोलिस तैनात:
मागील दोन दिवसांपासूनच छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील सिडको भागातील भुजबळ फार्म या निवासस्थानाबाहेर नाशिक पोलिसांचा बंदोबस्त आहे. अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी इथे 24 तास पहारा देत आहेत. मात्र, आता परिस्थिती आणखी चिघळू शकते हे लक्षात घेऊन पोलिसांच्या बंदोबस्तासह रॅपिड एक्शन फोर्सही तैनात करण्यात आली आहे.