लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबईमध्ये शिवसेना फेरीवाल्यांकडून खंडणी उकळली जातं असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. मुंबईत त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. "वीरप्पन गँगचा एन्काऊंटर करणार हे माझं ट्विट अनेक शिवसेना नेत्यांना झोंबलं होतं. वीरप्पन गँग कशी खंडणी वसुली करते याचे मी आज पुरावे घेऊन आलोय", असं सांगत संदीप देशपांडे यांनी भर पत्रकार परिषदेत शिवसेनेकडून फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या पावत्या सादर करण्यात आल्या.
"शिवसेनेने हॉकर्स झोनची घोषणा याआधीच केली होती. पण तसं काही झालंच नाही. आता शिवसेनेकडूनच फेरीवाल्यांना रितसर पावती देऊन खंडणी वसूल केली जात आहे. या पावतीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. याशिवाय सार्वजनिक पथाचा वापर करणाऱ्यांना होणार उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मुलनासाठी घेण्यात येणार आकार असं लिहीण्यात आलं आहे", असं संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
संदीप देशपांडे यांचे डोळे पाणावले
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेल्या पावतीच्या माध्यमातून खंडणी गोळा केली जात असल्याचं सांगताना संदीप देशपांडे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. "बाळासाहेबांचा, मुख्यमंत्र्यांचा, पर्यावरण मंत्र्यांचा फोटो पावतीवर लावून खंडणी वसूल केली जाते. मला सगळ्यात जास्त दु:ख याचं वाटतंय की या पावतीवर बाळासाहेबांचा फोटो आहे", असं म्हणत असताना संदीप देशपांडे यांचे डोळे पाणावले.
पोलिसांनी या खंडणीखोरांना वेळीच चाप लावणे गरजेचे असून अशा खंडणीखोरांच्या हातातून मुंबई वाचवणे गरजेचे असल्याचंही ते पुढे म्हणाले. मुंबई पोलिसांत याबाबत सविस्तर तक्रार देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.