लोकशाही न्यूज नेटवर्क
लवकच देशात पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यसाठी राष्ट्रीय पक्षांपासून ते प्रादेशिक पक्षांपर्यंत सर्वजण कामाला लागले आहेत. यातच केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाइं नेते रामदास आठवले यांनी तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरीच्या आगामी निवडणूक संग्रामात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे.
रामदास आठवले याबाबत लवकरच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याचेही सांगण्यात आले. शक्य आहेत तिथं भाजपाला पाठिंबा देऊ, असेही आठवले म्हणाले.
बिहारच्या निवडणुकीत लोक जनशक्ती पार्टीही अशाच पद्धतीनं मैदानात उतरली होती. दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान नेतृत्व करत होते. चिराग पासवान यांना फारसे यश मिळाले नाही. मात्र, काही प्रमाणात मतांचे विभाजन झाले आणि त्याचाच फटका काँग्रेस आणि राजदला बसल्याचं पहायला मिळाले. आता आठवलेंच्या या मनसुब्यानंतर राजकारणात अनेक चर्चांना ऊत आला आहे. भाजपा मागासवर्गीय मतांचं विभाजन करण्यासाठी आठवलेंमार्फत आपली बी टीम मैदानात उतरवत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
भाजपा प्रत्येक निवडणुकीत आपली बी टीम उतरवत असल्याचे आरोप नवे नाहीत. देशात एमआयएम, महाराष्ट्रातही वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याची टीका केली जाते आणि आता आठवलेंच्या या घोषणेनंतर पुन्हा या चर्चांना उधाण आले आहे. आठवलेंच्या रिपाइंने आगामी निवडणुका लढवल्यास भाजपाला किती फायदा होईल? आणि त्या बदल्यात आठवलेंच्या पदरात काय पडणार? हे येणारा काळच सांगेल.