संजय देसाई, सांगली | जलयुक्त शिवारामुळे राज्यात महापूर येत असल्याचं मत पर्यावरतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केलं होतं. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी भाजपला घेरलेलं असतानाच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रमध्ये वसंतदादा पासून आतापर्यत झालेल्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी 'पाणी आडवा, पाणी जिरवा'चा नारा दिला होता, त्यामुळे जलयुक्त शिवारच्या कामामुळे मराठवाड्यात पूर आला हे म्हणणे घाईगडबडीचे ठरेल, असे म्हणत त्यांनी भाजपची पाठराखण केली आहे.
खासदार राजू शेट्टी 7 ऑक्टोबरपासून अतिवृष्टी मधील नुकसानीच्या पाहणीसाठी मराठवाडा दौरा करणार आहेत. तसेच नुसते घोषणा करुन पोट भरत नाही, मदत द्या अन्यथा सरकारला उग्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशाराच शेट्टी यांनी दिला. राष्ट्रीय आपत्ती निवारण कोषमध्ये पडून असलेले हजारो कोटी रुपयाचा केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सढळ हाताने वापर करावा असा सल्ला त्यांनी दिला.