महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी महापालिका निवडणुका समोर ठेऊन पक्षाच्या सभासद नोंदणीला सुरुवात केली आहे. याचा शुभारंभ अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाला. ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने ही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. मोबाईलवर मिस कॉल देऊन देखील सभासद होता येणार आहे. या सभासद नोंदणीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: ट्वीट करत आवाहन केले आहे.
"विविध क्षेत्रांतील क्रियाशील, सृजनशील जनांनो राजकारणात या, मी तुम्हाला संधी द्यायला तयार आहे!", असे ट्विट राज यांनी केलंय.
मनसेची १५ वर्षे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १५ वर्धापन दिन काही दिवसांपूर्वीच साजरा झाला. करोनाच्या संकटामुळे वर्धापनदिनाचा मेळावा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्र सैनिकांना मार्गदर्शन केलं. अनेक पराभव पचवूनही गेली १५ वर्षे साथ देणाऱ्या मनसैनिकांचे राज ठाकरे यांनी आभार मानले. 'मी तुम्हाला कधीही विसरणार नाही,' असा शब्दही राज यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.