दिवाळीला सुरुनात झाली आहे. दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्ताने मुंबईतील अनेक नोकरदार, विद्यार्थी किंवा कामगार आपल्या गावी जातात. परंतु या काळात प्रवाशांना खासगी बसमध्ये प्रवास करण्यासाठी नियमित दरापेक्षा अधिकचे पैसे द्यावे लागत आहेत.
ट्रॅव्हल्सचालकांची दिवाळी होत अन् प्रवाशांचे दिवाळे निघाले आहे. याबाबत विचारले असता परिवहन विभागाच्या प्रवक्ता हेमंगिनी पाटील यांनी सांगितले की, 'दिवाळीनिमित्त विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. जे बसचालक जादा भाडे आकारतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.' दिवाळी, गणपती, दसरा असे सण-उत्सव असले की प्रत्येकाला चाहूल लागते, ती आपल्या गावाला जाण्याची, मात्र या उत्सव काळातला प्रवास म्हणजे एक दिव्य असते. कारण प्रचंड गर्दीमुळे गाड्यांमध्ये जागा मिळणे अवघड होते आणि खिशाला कात्री लागते. दिवाळीसाठी मुंबईतून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना सध्या खासगी बसच्या तिकिटासाठी दुप्पट ते अडीच पट पैसे मोजावे लागत आहेत. मुंबई-पुणे, पुणे-नागपूर, छत्रपती संभाजीनगर - मुंबई, कोल्हापूर - नागपूर आणि सोलापूर- नाशिक या मार्गांसह अन्य मार्गांवर प्रवास करण्यासाठी अनेकदा प्रवाशांची खासगी बस वाहतूकदारांकडून लूट केली जात आहे. एसटी महामंडळाने दिवाळीतील भाडेवाढ रद्द केल्याने एसटीच्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
स्लीपर तिकीट दर
मुंबई-पुणे- २,०००
मुंबई-छ. संभाजीनगर- २,५००
मुंबई-नागपूर ५,०००
मुंबई- सातारा २,८००