नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी नागपूर ते बिलासपूर या वंदे भारत रेल्वेचा शुभारंभही मोदींच्या हस्ते करण्यात आला आहे. आज वंदे भारतला पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवला. यानंतर वंदे भारत ट्रेनचे बुकींग सर्वसामन्यांसाठी खुले झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन नागपूर विमानतळावर झाले असून ते थेट ‘वंदे भारत एक्सप्रेस’चे उद्घाटन करण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले. नागपूर ते बिलासपूर या देशातील सहाव्या वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आलाे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागपूर ते बिलासपूर हे अंतर अवघ्या सहा ते साडेसहा तासात गाठता येणे शक्य होणार आहे. सध्या हे अंतर कापण्यास 7 ते 8 तास लागतात. दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेतर्फे ही गाडी चालवली जाणार आहे. 16 कोच असणाऱ्या या गाडीची आसनक्षमता 1 हजार 128 आहे. नागपूर ते बिलासपूरदरम्यान या गाडीला फक्त गोंदिया दुर्ग व रायपूर येथेच थांबा देण्यात आला आहे.
कसा असेल वंदे भारतचा प्रवास?
20825 वंदे भारत एक्सप्रेस 12 डिसेंबरपासून बिलासपूर येथून 6.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12.15 वाजता नागपूरला पोहोचेल. तर, 20826 वंदे भारत एक्सप्रेस 12 डिसेंबरपासून नागपूरवरून 14.05 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 19.35 वाजता बिलासपूरला पोहोचेल.
शनिवार वगळता आठवड्यातून सहा दिवस वंदे भारत रेल्वे सुरु राहील. या रेल्वेला रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया हे थांबे देण्यात आले आहेत. वंदे भारत एक्सप्रेसचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर सुरू होईल. ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.