महाविकास आघाडीमधील अनेक मंत्र्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला असताना आता आणखी एका मंत्र्याची ईडीकडून चौकशी सूरू झाली आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली. महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली आहे. ईडी अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना मी समाधानकारक उत्तरं दिली असल्याचे तनपुरे यांनी चौकशीनंतर माध्यमांना सांगितले.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील साखर कारखान्यांच्या घोटाळा प्रकरणात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. दुपारी 3 वाजता ईडी कार्यालयात तनपुरे यांच्या चौकशीला सुरुवात झाली होती. त्यानंतर रात्री 10 च्या सुमारास ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले.
मी ईडीला सविस्तर उत्तर दिलेली आहेत. मला जे जे प्रश्न विचारण्यात आले त्यांची मी त्यांना उत्तर दिलेली आहेत. जे आक्षेप नोंदवले जात आहेत त्यात काहीही तथ्य नाही. काही तांत्रिक माहिती जी मी पाठ करु शकत नाही ती मला पुन्हा बोलावल्यास मी ईडीच्या अधिकाऱ्यांना देईन, असं तनपुरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.