मुंबई : अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत असल्याने नागरिकांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. त्यानंतर शनिवारी केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल आणि डिझेलवरील (Petrol-Diesel) उत्पादन शुल्क कमी करुन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. अशातच आज राज्य सरकारनेही पेट्रोल डिझेलचे दर कमी केले आहेत.
केंद्र शासनाने पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आजपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (VAT) कपात केली आहे. इंधनावरील दरात अनुक्रमे २ रुपये ८ पैसे आणि १ रुपया ४४ पैसे प्रती लिटर कपात केली आहे. या निर्णायाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे वार्षिक सुमारे २५०० कोटी रुपये राज्याचा महसूल बुडणार आहे.
देशात इंधन दरांमध्ये मोठी वाढ झाल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील दर कमी केले आहेत. त्यानुसार पेट्रोलचे दर साडेनऊ रुपये तर डिझेलचे दर ७ रुपयांपर्यंत कमी होणार आहेत. तर राज्य सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करावी, असे आवाहन केंद्र सरकारने केले होते. दरम्यान, आता राज्यानेही पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात केली आहे.