नमित पाटील | बुलेट ट्रेन, मुंबई बडोदा द्रुतगती महामार्ग, वाढवण बंदर असे देशातील मोठं-मोठे प्रकल्प ज्या पालघर मध्ये प्रस्तावित आहेत त्याच पालघर जिल्ह्यातील गाव – पाड्यांना जोडणारे रस्ते नसल्याने येथील प्रसूतीसाठी वेदना होणार्या महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी खांद्यावरील डोलीचा आधार घ्यावा लागत असल्याच भीषण वास्तव समोर आल आहे.
जव्हार तालुक्यातील झाप मनमोहाडी येथील गर्भवती महिलेला अचानक प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. गावापर्यंत रस्ता नसल्याने कुटुंबासह गावकऱ्यांची ही तारांबळ उडाली. मनमोहाडी गाव आणि मुख्य रस्ता यांच्यामध्ये सहा ते सात किलोमीटर अंतर असून हा संपूर्ण भाग डोंगराळ आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी गर्भवती महिलेला चादरीच्या डोलीचा घेऊन हा डोंगर पार केला.
देश डिजिटल इंडियाकडे वाटचाल करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र मुंबई लगत असलेल्या पालघर मध्ये अजूनही अनेक गावांना जोडणारे रस्ते ही नाहीत. त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने येथील अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होतोय. विशेष म्हणजे जव्हार,मोखाडा,विक्रमगड या भागात कुपोषण,बालमृत्यू आणि माता मृत्यूंचे प्रमाणही आहे. मात्र या सगळ्याकडे प्रशासन आणि सरकार लक्ष कधी देणार असा सवाल उपस्थित केला जातोय.