मंत्रीमंडळ विस्तारात डॉ. प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने मुंडे समर्थकांमध्ये नाराजीचा सुर होता. हा सूर इतक्या टोकाला गेला होता कि, एका मागोमाग एक मुंडेंचे कार्यकर्ते राजीनामे देत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांची मनधरणी व आपल्या मनातील खदखद व्यक्त करण्यासाठी आज त्यांनी समर्थकांशी संवाद साधला. यावेळी पंकजा यांनी मला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत मी धर्मयुद्ध टाळत राहीन असा इशारा राज्यातील भाजप नेतृत्वाला दिला.
"पांडवांनी महाभारताचं युद्ध जिंकलं. धर्मयुद्ध टाळण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. पाच गावांची मागणी केलेली असतानाही कौरवांनी सुईच्या टोकावर येईल एवढीही जमीन देणार नाही अशी भूमिका घेतली. पण पांडवांनी नेहमी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न केला. कारण जो चांगला असतो तो नेहमी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करत असतो. मी देखील मला शक्य असेल तोपर्यंत धर्मयुद्ध टाळेन.
धर्मयुद्ध करायला गेलं तर माझेच सैनिक धारातिर्थी पडत आहेत. कोणताही माणूस वैयक्तिक हेतूने कोणताही निर्णय घेतो, तो लाभार्थी असतो. सगळ्या पक्षांच्या याद्या बघितल्या, तर एक व्यक्ती स्वतःचा विचार करून काहीही मिळवू शकतो. मला माझ्यासाठी नकोय, तुमच्यासाठी हवंय. हे धर्मयुद्ध टळण्यासाठी माझं ऐका. आपण कष्टाने बनवलेलं घरं का सोडायचं. ज्या दिवशी छत अंगावर पडेल त्यादिवशी बघू", अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली.