टोमॅटोच्या किमती गगनाला भिडले असताना आता कांदा देखील सर्वसामान्यांच्या डोळ्याला पाणी आणणार असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आणि गृहिणींना पुन्हा एकदा कांदा रडवणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
एपीएमसी बाजारात अगोदर प्रतिकिलो १५-१८ ते रुपयांनी उपलब्ध असलेले कांदे आता २० ते २५ रुपयांनी विक्री होत आहेत. तर किरकोळ बजारात ३० ते ३५ रुपयांनी विक्री होत आहे, तसेच कांद्याची साइज माल पाहूनही किंमत ठरवली जात आहे. सध्या पावसाने दांडी मारली असून पावसाळी कांद्याच्या उत्पादनाला फटका बसत आहे. त्यामुळे पुढील कलावधीत ही नवीन कांद्याची उत्पादन कमी असून कांद्याचे दर आणखीन वधारण्याची शक्यता आहे अशी, माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
कांद्याची आवक बाजारामध्ये कमी होत असल्यामुळे कांद्याच्या किमतीत वाढ होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या बाजारामध्ये टोमॅटो १०० ते १२० रुपये किलोने विकला जात असून आता त्या पाठोपाठ कांद्याच्या दरामध्ये देखील वाढ झालेली पाहायला मिळत आहे. सध्या कांद्याच्या दरात वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या आणि गृहिणींच्या डोळ्यात येणारे पाणी आणि कांदा जेवणातून गायब होणार की काय असेच दिसून येत आहे.