मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे पुढील महिन्यात ५ जून रोजी अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहेत. अशातच राज ठाकरे यांच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध दर्शविला आहे. राज ठाकरे यांनी प्रथम उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतर अयोध्येत पाऊल ठेवावे, अशी मागणी बृजभूषण सिंह यांनी लावून धरली आहे.
त्यावर मनसेच्या नेत्यांकडूनही बृजभूषण सिंह यांना प्रतिआव्हान देण्यात आले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेतेही अयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरे यांना लक्ष्य करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज (10 मे) मुंबईतील त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे (MNS) प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज ठाकरे मनसेच्या प्रवक्त्यांना काय सूचना देतात, हे पाहावे लागेल. यापूर्वी मनसेने उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनामुळे अयोध्येत गेल्यानंतर राज ठाकरे यांचा रोषाचा सामना करावा लागू शकतो.
दरम्यान खासदार बृजभूषण सिंह यांच्यासारख्या नेत्यांचा विरोध अयोध्येत राज ठाकरे यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन मनसेकडून राज ठाकरे यांच्या दौऱ्याची काळजीपूर्वक आखणी केली जात आहे. त्यामुळेच राज ठाकरे आजच्या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रवक्त्यांना काय मार्गदर्शन आणि सूचना करतात हे पाहावे लागणार आहे.