मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून आज सातवा दिवस आहे. आज अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपकऱ्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये सकारात्मक चर्चा झाली असून कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. उद्यापासून कर्मचारी कामावर रुजू होणार आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची बैठक आज विधिमंडळात पार पडली. सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळातील विश्वास काटकर यांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला असल्याची माहिती दिली. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत मागण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. याबाबत एक समिती नेमण्यात आली असून पुढील तीन महिन्यात ही समिती अहवाल सादर करेल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.