राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रे दिसतात पण मग शिवरायांचे कर्तृत्व का दिसत नाही असा सवाल त्यांनी ट्विटरवर विचारला आहे. सोशल मीडियावर पुणे (Pune) विमानतळावर काढण्यात आलेल्या पेटिंग्जबद्दलची पोस्ट करत त्यांनी हा सवाल केला आहे.
छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांचाही भूमिका बजावणारे अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुणे विमानतळावर असलेल्या पेन्टिंग्जवरून त्यांनी ट्वीट केले आहे. अमोल कोल्हे यांनी म्हटलं की, ज्या पुणे जिल्ह्यात शिवाजी महाराजांचा जन्म झाला, पुण्यात त्यांनी शाहिस्तेखानाची बोटं छाटली. त्या शिवाजी महाराजांचं कर्तृत्व पुणे विमानतळावर का दिसत नाही. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा इतिहास सांगणारं विमानतळावर काहीच नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करीत ट्विट केले आहे.
डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, याचा पुणे एअरपोर्ट आॅथॅरिटीला विसर पडला की काय?
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेकांनी हे ट्वीट योग्य असल्याचे म्हटले. तर, काही युजर्सने तुम्ही खासदार असून त्यावर कार्यवाही करा अशी मागणी केली आहे. डॉ. कोल्हे यांच्या ट्वीटला काहींनी विरोधदेखील केला आहे.