अभिजीत हिरे | भिवंडी शहरातील लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी पालिकेने आता पालिका मुख्यालयात 'नो डोस, नो एन्ट्री' सूरू केली आहे. लस न घेतलेल्या नागरीकांना पालिका मुख्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेच्या या फर्मानाने लसीकरणाचा टक्का वाढावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण टक्केवारी केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला अभिप्रेत असलेल्या टक्केवारी पेक्षा कमी असल्याने चिंता व्यक्त केली जात असतानाच पालिका मुख्यालयात प्रवेश करणाऱ्यांना लसीकरणाचे दोन डोस घेतले असणे बंधनकारक केले असून आयुक्तांच्या स्वाक्षरीचे आदेश मुख्यालय प्रवेशदावरवर लटकवले आहे.
सुरक्षारक्षक प्रत्येकाकडे लसीकरण झाले असल्याबाबतचे प्रमाणपत्र तपासूनच मुख्यालयात प्रवेश देत असल्याने लसीकरण न झालेल्या नागरीकांना प्रवेश नाकारला जात आहे.त्यामुळे प्रवेशद्वारावर काही जण सुरक्षा राक्षकांसोबत हुज्जत घालीत आहेत तर काही माघारी जात आहेत. दरम्यान भिवंडी पालिका क्षेत्रातील लसीकरणाची टक्केवारी कमी असून ती वाढविण्यासाठी पालिका प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत असली तरी त्यात सुधारणा होत नसल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे .