वाझे प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणावरून भाजपाने महाविकास आघाडी सरकार आणि ओघाने शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरून भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून भाजपाने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकारला धारेवर धरले होते. त्यावेळी सरकारने वाझे आणि परमबीर सिंह थेट कारवाई न करता, चौकशीनंतर निर्णय घेण्याचे जाहीर केले होते. पण वाझे यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केल्यानंतर परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली.
यासर्व घडामोडींवर निलेश राणे यांनी टीका करणारे ट्विट केले आहे. 'ज्या अर्थाने शिवसेना परमवीर सिंग यांच्या बदलीची आणि त्या अगोदर वाझे यांची बाजू घेत होती, असं वाटतं मातोश्रीसाठी सगळे दोन नंबरचे धंदे करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. हे दोन अधिकारी खरं बोलले तर, आर्थर रोड जेल हे नवीन मातोश्री होऊ शकतं, असे त्यांनी म्हटले आहे.