राज्यात MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्यानंतर अनेक शहरातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनास सुरुवात केली. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून 'जर नाईट क्लब चालतात, मग परीक्षा का नाही', असा सवाल उपस्थित पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही टोला हाणला आहे.
ग्रामपंचायत निवडणुका, नाईट क्लब सर्व नियम तोडून सरार्स चालतात. मग परीक्षा का नाही ? असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उपस्थित करत आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. तसेच सगळे नियम व दंड फक्त सामान्य जनतेलाच का ? नियमात भेदभाव का? असा प्रश्न देखील नांदगावकर यांनी केला.
एकीकडे तुम्ही माझे कुटुंब, माझी जवाबदारी म्हणता आणि दुसरीकडे मुलांची जबाबदारी नाकारता. मग या मुलांची जवाबदारी सरकारची नाही का? असा हल्लाबोल देखील नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
MPSC ची परिक्षा लांबणीवर टाकण्याचा आततायी निर्णय घेऊ नका. असे किती दिवस तयारी केलेल्या मुलांना मुलींना अधांतरी ठेवणार असा संतप्त पावित्रा घेत, सर्व प्रकारचे नियम पाळून हि परिक्षा घेणे जास्त उचित ठरेल असाही सल्ला देखील नांदगावकर यांनी दिला.
विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेचं काय ? – राजू पाटील
राज्यात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यात कोरोनाचे कारण सांगून पुन्हा एकदा MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्यांची वयोमर्यादा संपणार आहे त्या विद्यार्थ्यांचे काय ? असा आक्रमक सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला. तसेच ठरलेल्या तारखेप्रमाणे परीक्षा घ्या किंवा वयोमर्यादा वाढवून देण्यावर निर्णय घ्यावा अशी मागणी राजू पाटील यांनी केली.
तर जबाबदारी कोण घेणार? -अमित ठाकरे
MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. एमपीएससी परीक्षा पुढे ढकल्याने विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत. उद्या या विद्यार्थ्यांचा असंतोष तीव्र आंदोलनाच्या रूपाने बाहेर पडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? माझी राज्य सरकारकडे आग्रहाची मागणी आहे की, विद्यार्थ्यांच्या भावनांचा आदर ठेवून आपला निर्णय मागे घ्यावा व परीक्षा ठरलेल्या दिवशी म्हणजे १४ मार्च रोजीच घ्यावी.