औरंगाबाद : वादग्रस्त संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या भोवती राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) फास आणखी आवळला आहे. आज पुन्हा एनआयएने 13 ते 14 ठिकाणी पहाटेच्या सुमारास छापेमारी केली. औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, जालना आणि परभणी याठिकाणी छापेमारी करण्यात आली असून अनेक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने महाराष्ट्रातही कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबादसह सोलापूरमध्येही पीएफआयविरोधात एनआयएने कारवाई केली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. सोलापूरमधून एनआयएने एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. तर कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश, आसाममध्ये धाडसत्र सुरुच ठेवले असून देशभरात 25 ठिकाणी पुन्हा छापेमारी करण्यात आली आहे.
प्राथमिक वृत्तानुसार, तपास यंत्रणांनी आसाममधून 7 जणांना आणि कर्नाटकमधून 10 जणांना अटक केली आहे. यामध्ये पीएफआय आणि एसडीपीआयच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, अलीकडेच एनआयएने 95 ठिकाणी छापे टाकून 106 पीएफआय नेते आणि कार्यकर्त्यांना अटक केली.
दरम्यान, पीएफआयबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पीएफआयच्या रडारवर आरएसएस आणि भाजपचे अनेक मोठे नेते असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र एटीएस सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. धक्कादायक म्हणजे पीएफआयच्या निशाण्यावर नागपुरचा संघ मुख्यालयदेखील आहे. आरएसएसच्या दसरा मेळाव्याची माहितीही पीएफआयने काढली होती.