प्रशांत जगताप | सातारा : पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एक अनोखी बस तयार केली आहे.ही पर्यटन बस महाबळेश्वर पर्यटनासाठी वेगळ्या पद्धतीने बनविण्यात आली आहे.
महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या प्रवाशांना, पर्यटकांना विविध ठिकाणच्या पर्यटनाचा आनंद घेता यावा यादृष्टीने या बसची बांधणी करण्यात आली आहे. महाबळेश्वर आणि प्रतापगड या पर्यटन ठिकाणी ही बस धावणार आहे. सातारा आगारामध्ये ही बस दाखल झाली असून या बसमध्ये 42 प्रवाशांची आसन क्षमता आहे. या बसचे वैशिष्ट्य म्हणजे बसच्या टपाला पूर्णपणे सन रूफ असल्यामुळे पर्यटकांना बाहेरच्या निसर्गाचा आनंद लुटता येणार आहे. तसेच बसच्या सीट शेजारील असणाऱ्या खिडकीचा काचा देखील वाढवण्यात आल्यामुळे ही बस आकर्षक स्वरूपात दिसत आहे त्यामुळे निसर्गाचे रूप उघड्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. मागील वर्षी या बसचा प्रयोग अयशस्वी झाल्यामुळे या बसमध्ये बदल करून पुन्हा एकदा ही बस सातारा जिल्ह्यातील पर्यटनासाठी सज्ज झाली आहे.