हर्षल भदाणे पाटील, नवी मुंबई | खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi rana) यांना वांद्रे न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता रवी राणा यांची आर्थर रोड कारागृहात तर नवनीत राणा यांची तळोजा कारागृहात रवानगी होणार होती. या घटनेची माहिती मिळताच शिवसैनिकांनी तळोजा कारागृहाबाहेर एकच गर्दी केली आहे.
'मातोश्री'विरोधात पंगा घेणाऱ्या राणा दाम्पत्याला रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी राणा यांची रवानगी तळोजा कारागृहात होणार असल्याचे समजताच शिवसैनिकांनी तळोजा कारागृहाबाहेर एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली. 'रवी राणा हाय हाय, बंटी बबली हाय हाय' म्हणत शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. यावेळी शिवसैनिक हातात पुष्पगुच्छ आणि हातात पेढे घेऊन होते. यावेळी शिवसैनिकांना पेढे आणि फुलहार कशासाठी ? याबाबत विचारणा केली असता अद्याप रवी राणा यांना मातोश्री वर शिवसैनिकांचा प्रसाद मिळाला नाही आम्ही इथे त्यांना प्रसाद आणि स्वागतासाठीच इथे जमलो असल्याचे युवासेनेचे उप जिल्हाप्रमुख अवचित राऊत यांनी सांगितले. यावेळी पोलिसांचाही चोख बंदोबस्त तळोजा कारागृहार बाहेर पहायला मिळाला.
सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली १५३ अ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी त्यांना शनिवारी अटक केली. सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले, ''मुख्यमंत्र्यांच्या घरी कुणाला जायचं असेल तर परवानगीची गरज असते. तशी नोटीस राणा दाम्पत्याला दिली होती. मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरुन त्यांनी चॅलेंज केलं. त्यांनी नोटिशीला न जुमानता सरकारला आव्हान दिलं. त्यामुळं त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला, त्यामुळं त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,'' असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले.