नागपुर : कल्पना नळसकर | नागपूरमध्ये गेल्या 24 तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला असून परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ झाली.
हवामान खात्याने शुक्रवारी विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा (Rain Alert) दिला होता. हवामान खात्याचा अंदाज तंतोतंद खरा ठरला. शुक्रवारी दिवसभर नागपूरमध्ये पाऊस सुरू होता. सायंकाळनंतर या पावसाची तीव्रता अधिकच वाढली. धुव्वाधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला.
तलावातून मोठ्या प्रमाणातून पाणी बाहेर पडल्याने रस्त्यालगत असलेल्या शेकडो घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक पावसाचं पाणी घरात शिरल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांनी संपूर्ण रात्र जागून काढली.
दरम्यान, अंबाझरी लेआऊट परिसरात मुलांची अंध मुलांचे वसतीगृह आहे. या वस्तीगृहात देखील मध्यरात्रीच्या सुमारास पाणी शिरलं. त्यामुळे मुलांना तातडीने पहिल्या माळ्यावर हलवण्यात आलं. अंबाझरी तलाव फुटला अशी अफवा काही नागरिकांनी फिरवली.
घटनेची माहिती मिळताच महापालिकेतील यंत्रणा तात्काळ परिसरात दाखल झाली. मध्यरात्री महापालिकेचे सुमारे 40 अधिकारी घटनास्थळी पोहचले. पाहणी केल्यानंतर तलाव फुटला नसून तो ओव्हरप्लो झाला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.