मुंबईकरांनी जोरदार दिवाळी साजरी केली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 24 तासांत मुंबईत तब्बल 150 कोटी रुपयांचे फटाके फुटल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता (AQI) पातळी पुन्हा खालावली आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी 288 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आले आहेत.
मुंबईमध्ये वायु प्रदूषणाची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली सध्या पहायला मिळतेय. दिवाळीच्या निमित्त नागरिकांना आव्हान करून देखील मोठ्या प्रमाणात फटाकडे फोडण्यात आले आहेत त्यामुळे प्रदूषणामध्ये आणखी वाढ झाल्याचे चित्र सध्या मुंबईमध्ये दिसून येत आहे. सल्फर डायॉक्साईडची लेव्हल 4 वर गेली आहे, जी 2 पर्यंत असायला हवी. मुंबईची हवेची गुणवत्ता अधिक खालावली आहे. तर दुसरीकडे कोर्टाचे आदेश धाब्यावर बसवत मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले. यामुळे ध्वनी प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात झालं आहे.