कोरोना प्रतिबंधानंतर दोन वर्षांनी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज आहेत. मुंबईतील प्रमुख ठिकाणी मुंबईकर जनता मोठ्या प्रमाणात जमणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलीसांकडून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शहरातील प्रमुख ठिकाणी 11500 पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत. नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी मुंबईतील विविध ठिकाणांसह गेट वे ऑफ इंडियासह इतर समुद्र किनारी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. सेलिब्रेशन मूडला गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहे.
नवीन वर्ष संपूर्ण शहरात शांततेत साजरे व्हावे यासाठी मुंबई पोलिसांनी संपूर्ण मुंबईतील समुद्रकिनारी सुरक्षा वाढवली आहे. मुंबई पोलिसांनी 18 बोटी सागरी सीमेवर तैनात केल्या आहेत. 18 बोटींपैकी 16 बोटी महत्त्वाच्या ठिकाणी तर 2 बोटी स्टँडबाय ठेवण्यात आल्या आहेत. 31 डिसेंबरच्या सकाळपासून 1 जानेवारीच्या सकाळपर्यंत 24 तास तैनात पोलीस बंदोबस्त असणार आहे.
31 डिसेंबरला नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू बीच, उपनगरी वांद्रे, बँडस्टँड, अक्सा बीच, भाऊचा धक्का आणि इतर प्रमुख ठिकाणांजवळ मोठी गर्दी जमू शकते. या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागतादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सज्ज आहेत. सेलिब्रेशनसाठी लोकांनी समुद्रात जाऊ नये यासाठीही पोलीस लक्ष देणार आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीदेखील पोलीस काळजी घेणार आहेत.