चेतन ननावरे, मुंबई: महापालिका रुग्णालयांमधील औषध खरेदीची उच्चस्थरीय चौकशी करण्यात येईल तसेच मुंबई महापालिका रुग्ण सेवेची श्वेतपत्रिकाच एकदा काढावी लागेल, अशी स्पष्ट भूमिका मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केली.
मुंबईतील आरोग्य सेवेबाबतची अर्धातास चर्चा आज सकाळी विधनसभेच्या विशेष कामकाजात आमदार अमिन पटेल यांनी केली होती. या चर्चेत सहभागी होताना आमदार आशिष शेलार यांनी मुंबईतील आरोग्य सवेचा आढावा सभागृहासमोर मांडला.
आशिष शेलार म्हणाले की, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असल्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून रुग्ण सुध्दा मोठया प्रमाणात मुंबईत येतात. मुंबईत महापालिका, राज्य शासन, खाजगी, धर्मदाय, आणि केंद्रीय कामगार अशी विविध रुग्णालये असून या सगळयाचा ताळमेळ दिसून येत नाही. त्यामुळे सरकारने एकदा या सगळयाचा एक समग्र आढावा घेऊन किती रुग्ण मुंबईत येतात, त्यांना असलेली रुग्णालये पुरेशी आहेत का? त्यावर किती खर्च होतो या सगळयाची श्वेतपत्रीका काढावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.
धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारीत येणारी जी रुग्णालये आहेत त्यांना सरकारकडून देण्यात येणा-या सुविधा व रुग्णालयाकडून मिळणारी सेवा याबाबतचा आढावा घेऊन त्याची पडताळणी करण्यात यावी. त्यांच्याकडून शासनाच्या अटीशर्ती पाळण्यात येतात का, अशी दुसरी मागणी आमदार शेलार यांनी केली.
मुंबई महापालिका सुमारे ४ हजार कोटी रुपये आरोग्यासाठी वर्षाला म्हणजे पाच वर्षात २० हजार कोटी रुपये आरोग्य यंत्रणेवर खर्च केले. जातात साधारणत: ढोबळ अंदाज मांडला तर ४५ हजार मुंबईकरांसाठी हे खर्च होतात. यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला जातो. मुंबईकर ज्या पध्दतीने कर देतात त्या पटीने त्यांना सुविधा मिळत नाही यामध्ये कुठेही ताळमेळ दिसून येत नाही, महापालिका एकिकडे पाच वर्षाला २० हजार कोटी रुपये खर्च करते आणि रुग्णांना औषधे मिळत नाहीत. पालिका रुग्णालयात गेलेल्या रुग्णांना बाहेर औषधे आणण्यासाठी पाठविण्या येते, एक्सरे, सोनोग्राफीसाठी बाहेर पाठवले जाते. त्यामुळे यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली.
खाजगी रुग्णालयात जी औषधे आणि इंजेक्सन दिली जातात त्याचे दर अवाजवी आकारले जातात, त्यामुळे रुग्णांना नाहक फटका बसतो त्यामुळे सरकारने यासाठी एक दरपत्रक जाहीर करावे, अशी मागणी आमदार शेलार यांनी केली तर मुंबईत येणा-या कॅन्सर रुग्णालयांच्या नातेवाईंची राहण्याची मोठी गैरसोय होते त्यासाठी काही खास इमारती बांधण्यात याव्यात अशी मागणीही यावेळी आशिष शेलार यांनी केली.
दरम्यान, यार्चेमध्ये आमदार मनिषा चौधरी यांनीही उपनगरातील रुग्ण्सेवेचा उडलेला बोजवारा मांडला. त्यावर उत्तर देताना मंत्री उदय समांत यांनी मुंबईतील आरोग्य सेवेची श्वेतपत्रीका काढण्याची गरज मान्य केली तसेच मुंबई महापालिका रुग्णालयातील औषध खरेदीची उच्चस्थरीय चौकशी करण्यात येईल अशी घोषणा केली.