निस्सार शेख | रत्नागिरी : ओडिशाच्या बालासोरमध्ये कोरोमंडल एक्सप्रेसचा शुक्रवारी म्हणजे 2 मे रोजी भीषण अपघात झाला. यामुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आलेली मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा लोकार्पण कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. या अपघातामुळे संपूर्ण देश मोठ्या दुःखात आहे. विदेशातूनही अनेक राष्ट्रप्रमुखांनी भारताच्या या दुःखात सामील होत या रेल्वे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
ही घटना काळीज उद्विघ्न करणारी असल्याने मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसच्या 3 जूनला होणाऱ्या लोकार्पणाचा सोहळा देखील रद्द करण्यात आला होता. 3 जून 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाणार होता. मात्र बालासोर मध्ये घडलेल्या या भीषण रेल्वे अपघातानंतर हा उदघाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. मात्र आता या ट्रेन संदर्भात कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाडगे यांनी एक मोठी माहिती दिली आहे.
घाटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 जून 2023 पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान नियमितपणे सुरू केली जाणार आहे. निश्चितच गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसची वाट पाहणाऱ्या रेल्वे प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे दुर्घटनेमुळे ही गाडी शुक्रवारी रात्रीच मुंबईला रवाना झाली होती. आता ही गाडी 5 जूनपासून नियमित सुरु होणार आहे.
कसं राहणार वेळापत्रक?
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर शुक्रवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे. ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी पाच वाजून 25 मिनिटांनी मडगाव रेल्वे स्थानकाकडे रवाना होणार आहे आणि दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी ही ट्रेन मडगाव रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
तसेच मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रवासाच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर दुपारी ही ट्रेन मडगाव रेल्वे स्थानकावरून दोन वाजून 35 मिनिटांनी सुटणार आहे आणि रात्री दहा वाजून पंचवीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसला कुठे राहणार थांबा?
मार्च महिन्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई गोवा मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून या मार्गावर ही हायस्पीड ट्रेन केव्हा धावणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान आता मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस 5 जून 2023 पासून नियमित सुरु होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेसला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिवी या मार्गावरील अतिमहत्त्वाच्या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे