मुंबईत पावसाळ्यात इमारत दुर्घटनेच्या अनेक घटना घडतात. मात्र, पाऊस नसतानाही सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास कुर्ल्यातील नेहरू नगर येथे चार मजली इमारत (Mumbai Building Collapse) कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्या खालून आणखी एका व्यक्तीला जिवंत बाहेर काढण्यात बचाव आणि मदत पथकाला यश आलं आहे. या दुर्घटनेत मंगळवारी संध्याकाळपर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
कुर्ल्यात मध्यरात्री चार इमजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. यानंतर लगेचच मुंबई महापालिका आणि एनडीआरएफच्या पथकांकडून बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच मंत्री आदित्य ठाकरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला. पहाटे तीन वाजेच्या सुमारास मंत्री आदित्य ठाकरे पोहोचले.
ही जुनी इमारत होती आणि महापालिकेने नोटीस दिलेली होती. इमारत धोकादायक झाल्याने महापालिकेने नोटीस देऊनही ती रिकामी करण्यात आली नाही. आता या घटनेत सर्वप्रथम बचावकार्यावर भर देण्यात येत आहे आणि जखमींवर उपचार करण्यात येत आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. ढिगाऱ्याखाली नेमके किती जण अडकले आहेत, याची कुठलीही ठोस माहिती अद्याप तरी हाती आलेली नाही, असं एनडीआरएफचे डेप्युटी कमांडंट आशिष कुमार यांनी सांगितलं.