प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळून आली होती. या प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. या प्रकरणाला आता नवीन वळण घेताना दिसतंय. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं तिहार तुरुंगात धाड टाकून एका दहशतवद्याकडून मोबाईल जप्त केल्याचं सांगण्यात येतंय.
धमकी देणारा 'जैश उल हिंद'च्या टेलिग्राम चॅनलची लिंक पोलिसांना तिहार तुरुंगात आढळली होती. इंडियन मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याच्या बरॅकमधून मोबाईल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती मिळत नाही.
तिहार तुरुंगात गुरुवारी सायंकाळी ६.०० वाजल्यापासून रात्री ९.०० वाजेपर्यंत दिल्ली स्पेशल सेलनं तुरुंग क्रमांक ८ मध्ये छापे टाकले. त्यानंतर इंडियन मुजाहिद्दीचा दहशतवादी तहसीन अख्तर याच्या बरॅकमधून मोबाईल हस्तगत करण्यात आला. याच मोबाईलवरून टेलीग्राम चॅनल अॅक्टिवेट करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
तहसीन अख्तरच्या बरॅकमधून जो मोबाईल हस्तगत करण्यात आला त्या मोबाईलमध्ये 'टोर ब्राउजर'द्वारे व्हर्च्युअल क्रमांक तयार करण्यात आला. त्यानंतर टेलिग्राम अकाउंट तयार करून त्याद्वारे धमकीचे मॅसेज तयार करण्यात आले. तहसीन अख्तरची तुरुंगाकडून रिमांड घेऊन स्पेशल सेलकडून त्याची चौकशी केली जाणार आहे. यासोबतच आणखी एक क्रमांकही स्पेशल सेलच्या रडारवर आहे. हा क्रमांक सप्टेंबर महिन्यात अॅक्टिव्ह झाला होता त्यानंतर तो बंद करण्यात आला. दोन मोबाईल नंबर खोट्या कागदपत्रांसहीत तिहारमध्ये बंद असलेल्या काही लोकांसाठी खरेदी करण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.