पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला मोठे यश आले आहे. 25 ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आज सकाळी 10 वाजता बैठक झाली. या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणाल्या की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २५ ऑगस्ट २०२४ रोजी होऊ घातलेली राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पुर्व परीक्षा-२०२४ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ‘आयबीबीपीएस’ परीक्षाही याच तारखेला असल्यामुळे दोन्ही परीक्षा देता येणे शक्य व्हावे या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दखल शासनाला अखेर घ्यावीच लागली असून आता दोन्ही परीक्षा मुलांना देता येतील.
यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, आंदोलक विद्यार्थ्यांचे याबद्दल हार्दिक अभिनंदन व आयोगाचे आभार. आयोगाने आता या परीक्षेचे परिपत्रक लवकरात लवकर प्रसिद्ध करणे गरजेचे आहे. तसेच या परीक्षेमध्ये महाराष्ट्र कृषी सेवा गट अ, ब आणि ब ( कनिष्ठ) संवर्गातील पदांचा देखील समावेश करावा अशी देखील या विद्यार्थ्यांची मागणी आहे. याबाबत आयोगाने तातडीने आपली भूमिका जाहिर करण्याची गरज आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.