मराठा आरक्षणासंदर्भातले पाच प्रश्न मी सरकारच्या पुढे मांडले होते. हे पाचही प्रश्न अद्याप मार्गी लागले नाहीत. यातील एकाच प्रश्नावर सरकारने काम केले आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा. मी शांत बसलो आहे पण वेळप्रसंगी यावर बोलेन अशी तिखट प्रतिक्रिया छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिली.
पुण्यात बालेवाडी येथे एका कार्यक्रमानिमित्त माध्यमांना प्रतिक्रिया संभाजीराजे म्हणाले की, मराठा समाजाचे मूलभूत पाच प्रश्न मी सरकारच्या पुढे मांडले होते. हे सरकारच्या हातातील विषय आहेत. आरक्षण टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. ओबीसींना शिक्षणामध्ये सवलती मिळत आहेत तसेच मराठा समाजाला द्या. आत्महत्या केलेल्या मुलाला दहा लाख रुपये देण्याचे एकच काम सरकारने केले आहे. त्यामुळे अजूनही काही झालेले नाही हेच मला परखडपणे सांगायचे आहे," अशी प्रतिक्रिया संभाजीराजे भोसले यांनी दिली.
"सगळ्या मराठ्या समाजाच्या संघटनांना मराठा आरक्षणार बोलण्याचा अधिकार आहे. मी सुद्धा सरकारला अनेकवेळा सांगितले आहे की, आरक्षण हा वेगळा टप्पा आहे ते लगेच लागू होऊ शकत नाही. पण मूलभूत पाच प्रश्न मी सरकारच्या पुढे मांडले होते. अजूनही ते प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. मी शांत बसलो आहे. लोकंसुद्धा मला विचारत आहेत की शांत का बसला आहात. पण वेळप्रसंगी मी यावर बोलेन. सरकारकडून अनेक गोष्टी अशा घडत आहेत ज्या बरोबर नाहीत. लवकरात लवकर त्यांना निर्णय घ्यावा नाहीतर मराठा समाज गप्प बसणार नाही," असे संभाजीराजे म्हणाले.