खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात ओमराजे निंबाळकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्यातील शेतकरी उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणून सोयाबीन पिकाचे लागवड मोठ्या प्रमाणात करतात. दरवर्षी वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सोयाबीन पिकाचे उत्पन्न व त्यावर होणाऱ्या खर्चात मोठी तफावत निर्माण होत आहे. यामुळे शेतक-यांचे उत्पन्न कमी होत आहे.
तसेच 2013-14 वर्षामध्ये सोयाबीनचे शासकीय खरेदी दर 4600 रुपये प्रती क्विंटल होता. परंतु 10 वर्षानंतर 2023-24 मध्ये यात घट करण्यात आली असून खरेदी दर 4100 रुपये प्रती क्विंटल करण्यात आला आहे. याउलट सोयाबीन पिकाचे उत्पन्न घेण्याकरीता लागणाऱ्या मूलभूत वस्तूवरील महागाई 250 टक्क्यापेक्षा जास्तीची नोंदवली गेली आहे.
यासोबतच ते म्हणाले की, वर्ष 2024-25 मध्ये राज्य शासनाने सोयाबीनचे किमान खरेदी मुल्य 4892 रुपये एवढे निश्चीत केले आहे. चालू वर्षाचा महागाई दर लक्षात घेता शेतकऱ्यांच्या हाती सोयाबीन पिकातून नगन्य रक्कम शिल्लक राहत आहे. सोयाबीन पिकाकरीता किमान खरेदीमुल्य 6 हजार रुपये प्रती क्विंटल दर निश्चीती करुन शासकीय खरेदी केंद्र सुरु करणेबाबत आपल्या स्तरावरुन योग्य ते सहकार्य करावे. असे ओमराजे निंबाळकर म्हणाले.