निसार शेख | चिपळूण : स्थानिकांच्या विरोधामुळे एकीकडे रिफायनरी प्रकल्प वादाच्या भोवन्यात सापडलेला असतानाच या प्रकल्पासाठी कोयनेचे पाणी वापरण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. हे पाणी चिपळुणातून आणणे शक्य आहे का, याचा प्राथमिक सर्वेक्षण अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी चिपळूण ते राजापूर अशी १६० कि.मी.च्या पाईपलाईनसाठी १ कोटी ९० लाख रुपये खर्चून खासगी कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी वाशिष्ठीत लहान धरण बांधण्याचे नियोजन असून त्यासाठीच्या माती परीक्षणासाठी बोअर खोदाईचे काम पूर्ण झाले आहे.
कोयना धरणातून सोडण्यात येणारे ६७.५ टीएमसी पाणी हे वाशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्राला वाहून जाते. यातील १४ लाख लिटर पाणी चिपळूण नगर परिषद उचलते. शिवाय वाशिष्ठी नदीलगतच्या गावांची तहान याच पाण्यावर भागवली जाते. तसेच कोकण रेल्वे, खेर्डी, खडपोली व लोटे एमआयडीसीसाठी वाशिष्ठी नदीतून कोयनेचे पाणी उचलले जाते. मात्र, बरेचसे पाणी हे समुद्राकडे वाहून जाते. गेली अनेक दशके वाया जाणारे हे पाणी वापरात यावे, यासाठी आतापर्यंत अनेक समित्या नेमण्यात आल्या. मात्र, त्यांनी दिलेले अहवाल हे बासनात गुंडाळून ठेवण्यात आले.
आतापर्यंत सुमारे २३ कि.मी. चे सर्वेक्षण पूर्णही झाले आहे. यात पिंपळीजवळ कॅनॉल संपतो, त्या ठिकाणी धरण बांधण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी आवश्यक माती परीक्षणासाठीच्या बोअर खोदाई या भागात ठिकठिकाणी करण्यात आली आहे. एकूण १६० कि.मी. लांबीची ही पाईपलाईन असणार असून ती चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर अशा ४ तालुक्यातून नेण्याचा विचार आहे. त्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. मे महिन्यात चिपळूण दौन्यावर आलेले राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी कोयनेचे पाणी राजापूर बारसूतील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी नेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची अनौपचारिकरित्या माहिती दिली होती.