गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील (North India) बहुतांश राज्यांच्या तापमानात घट झाली असली तरी अजूनही वातावरण उष्णच आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये पावसामुळे लोकांना दिलासा मिळाला असून आता इतर राज्यातील लोक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता यंदा मुंबईत (mumbai monsoon) मान्सून लवकर धडकणार असून पुढील महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.
मान्सून पावसाच्या आगमनाचा चार्ट जारी
हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर ( K. S. Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएमडीने चार आठवड्यांचा मान्सून पावसाच्या आगमनाचा चार्ट जारी केला आहे, त्यानुसार मुंबई आणि महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील इतर भागात ३ ते ९ जून दरम्यान मान्सूनचे आगमन होईल.
या पावसाची तीव्रता १० ते १६ जूनपर्यंत वाढेल
दरम्यान मान्सूनच्या या चार्टमध्ये केरळ आणि उर्वरित नैऋत्य भागात २० मे पासून मुसळधार पाऊस सुरू होणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. मुंबई आणि इतर पश्चिम किनारपट्टी भागांमध्ये मान्सूनपूर्व सरींच्या आगमनानुसार ३ जून किंवा त्यानंतर हा पाऊस हळूहळू पश्चिम किनार्याकडे जाण्याची अपेक्षा आहे. या पावसाची तीव्रता १० ते १६ जूनपर्यंत वाढेल, ज्यामुळे मुंबई आणि देशातील बहुतांश भाग मान्सूनमध्ये दाखल होतील, अशी माहिती हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.