पुणे | अमोल धर्माधिकारी : गुढी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क येथील जाहीर सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकारण गरम केलं आहे. राज्यात सध्या हनुमान चालिसा आणि अयोध्येचा दौरा चर्चिला जातोय. त्यानंतर कल्याण-डोंबिवलीसह मराठवाडा येथाील कार्यकर्त्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली.तर पुण्यात मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेच्या नेमकी विरूध्द भूमिका घेतली. परिणामी पुण्यातील मनसैनिक नाराज असल्याची चर्चा रंगलेली असतानाच आता राज ठाकरेंच्या सभेच्या दिवशीच मनसेचे 15 हून अधिक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी दावा केला आहे.
सध्या ठाकरेंच्या सभेची मनसेकडून युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे. त्यातच सेनेने मोठा धक्का देण्यासाठी कंबर कसली आहे. कारण राज ठाकरे यांच्या सभेदिवशीच मनसेचे २० पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
उद्या (22 मे) मनसेचे 15 हून अधिक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे पुणे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत सेनेच्या शहर कार्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे. यातून राज ठाकरेंच्या सभेदिवशीच मनसेला मोठा धक्का देण्याची खेळी शिवसेनेनी खेळल्याचं कळतंय.
याआधीही पुण्यातील मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला होता. यानंतर पुन्हा ही सभा गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी २२ तारखेला सकाळी दहा वाजता होणार असल्याचं स्पष्ट झालं. या सभेचा टिझरही रिलीज करण्यात आला आहे.
शिवाजीनगरचे विभागअध्यक्ष रणजीत शिऱोळे यांनी बैठकांना बोलवत नसल्याची तक्रार केली होती. त्या नाराजीतून मनसेचे पदाधिकरी एकमेकांना भिडले. आता पुन्हा काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज असल्याचं समोर आलंय. त्यामुळे ठाकरे यांच्या सभेच्या दिवशीच ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.