मयुरेश जाधव | अंबरनाथमध्ये मनसेनं कोरोनारुपी फुग्याला लस टोचून प्रतीकात्मक दहीहंडी फोडली. मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांच्या संकल्पनेतून ही अनोखी दहीहंडी साजरी करण्यात आली.या माध्यमातून लस घेऊन कोरोनाला आला घालण्याचं आवाहन मनसेकडून करण्यात आलं.
राज्य सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मागील वर्षी दहिहंडीवर घातलेली बंदी अजूनही कायम आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेनं हिंदूंच्याच सणांवर नियम आणि अटी का लावले जातात, असा सवाल उपस्थित करत अनेक ठिकाणी प्रतिकात्मक दहीहंडी फोडली. अंबरनाथमध्ये मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर आणि मनसेच्या माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर यांच्या माध्यमातून कोरोनारूपी हंडीला लस टोचण्यात आली. अंबरनाथच्या कानसई पोलीस चौकीसमोर ही फुग्यांची हंडी लावण्यात आली होती. मात्र यात दहीहंडीच्या ऐवजी कोरोना व्हायरस लिहिलेला मोठा फुगा लावण्यात आला होता. या फुग्याला लस रुपी इंजेक्शन टोचून ही प्रतीकात्मक हंडी फोडण्यात आली. या माध्यमातून लस घेऊन कोरोनाला आला घालण्याचं आवाहन मनसेकडून करण्यात आलं. सर्वांनी लस घेऊन देश कोरोनमुक्त झाला, तर किमान पुढच्या वर्षी तरी आपल्याला पूर्वीच्याच उत्साहात दहीहंडी साजरी करता येईल, त्यामुळं सगळ्यांनीच लस घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.