उल्हासनगर (मयुरेश जाधव): उल्हासनगर शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी एमएमआरडीएने तब्बल १०१.८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उल्हासनगर शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात विकासकामांसाठी निधी मिळाला आहे. त्यामुळे आता उल्हासनगरमधील रस्ते खड्डेमुक्त होण्याची आशा निर्माण झालीय आहे.
उल्हासनगर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून काही रस्ते अक्षरशः खड्ड्यात गेले होते. या रस्त्यांवरून वाहनं चालवणं तर सोडा, पण साधं चालणंही अवघड झालं होतं. त्यामुळे उल्हासनगरवासियांमधून मोठा रोष व्यक्त केला जात होता. त्यामुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगर शहरातील रस्त्यांसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी एमएमआरडीएकडे केली होती. या मागणीला अखेर यश आलं असून एमएमआरडीएनं उल्हासनगरच्या ५ प्रमुख रस्त्यांसाठी मिळून तब्बल १०१.८२ कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.
या निधीतून उल्हासनगरच्या ए ब्लॉक ते डॉल्फिन क्लबमार्गे साईबाबा मंदिर, सोनारा चौक ते शारदा केस्टलमार्गे कोयंडे, वाको कंपाउंड ते व्हीनस चौक, हिरा घाट मंदिर ते डर्बी हॉटेलमार्गे समर्पण अपार्टमेंट, शाम प्रसाद मुखर्जी चौक ते शांतीनगरमार्गे विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन या पाच प्रमुख रस्त्यांचं काँक्रीटीकरण केलं जाणार आहे. त्यामुळे उल्हासनगरचे रस्ते खड्डेमुक्त राहण्यास मदत होणार असल्याची माहिती उल्हासनगर महापालिकेचे नगरसेवक आणि महापौर लीलाबाई आशण यांचे सुपुत्र अरुण आशान यांनी दिली आहे.