नुकताच काही दिवसांपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना हॅलो ऐवजी 'जय हिंद' म्हणावं लागेल अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. त्यानंतर आता मंत्री मुनगंटीवार यांनी 'जय जय महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत होणार असल्याची माहिती एका वृत्तपत्राला दिली आहे.
राज्य सरकार 'जय जय महाराष्ट्र माझा' या गीताला राज्याचे अधिकृत राज्य गीत म्हणून अंतिम रूप देण्याच्या तयारीत आहे. हे गाणं राज्य गीत झाल्यानंतर अधिकृत गाणं असलेल्या देशातील निवडक राज्यांच्या यादीत लवकरच महाराष्ट्राचा समावेश होऊ शकतो अशी माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी दिली आहे.
सध्या देशातील फक्त 11 राज्यांचे आपापले स्वतंत्र राज्यगीत आहे. यात आता महराष्ट्राचे देखील गीत असणार आहे. अधिकृत राज्य गीत म्हणून 'जय जय महाराष्ट्र माझा' या गाण्याला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्यता मिळेल, मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.
'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत कवी रादा बधे यांनी लिहिले आहे. तर श्रीनिवास खळे यांनी त्याला संगीतबद्ध केले आहे. तर कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी हे गीत गायले आहे. 2015 मध्ये शाहीर साबळे यांचे निधन झाले. त्यामुळे साबळे यांचे जन्मशताब्दी वर्ष राज्यात साजरे केले जात आहे. त्या निमित्ताने हे गीत रिलीज होणार आहे. हे गीत 1.15 ते 1.30 मिनिटांत बसेल असे नियोजन केले जात आहे. राष्ट्रगीताची वेळ देखील फक्त 52 सेकंद आहे. कार्यक्रमांच्या सुरुवातीला हे गाणे गायले जाईल आणि राष्ट्रगीताने संबंधित कार्यक्रमाची सांगता होईल, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे.