म्हाडा मुंबई मंडळातर्फे 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली आहे. 9 ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील पहाडी गोरेगाव अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. म्हाडानं तयार केलेल्या नव्या अॅपमधून हे अर्ज सादर करण्याचं आवाहन म्हाडाकडून इच्छुक नागरिकांना करण्यात आलं आहे. पण याची नोंदणी सुरु होताच अॅपमध्ये बिघाड झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
नोंदणीसाठी म्हाडाकडून वेबसाईट आणि ॲपद्वारे नोंदणी करण्याचे दोन पर्याय नागरिकांना उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, काल बारा वाजता ऑनलाईन नोंदणी सुरू झाल्यापासून म्हाडाच्या ॲपमध्ये बिघाड झाला आहे. लाखो रुपये खर्च करून म्हाडानं या ॲपची निर्मिती केली.
ऐन नोंदणी काळातच हे ॲप बंद पडल्यामुळं या ॲपच्या दर्जाविषयी शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. मुंबईत हक्काचे घर असावं यासाठी म्हाडा ॲपवर नोंदणी करणारे नागरिक मात्र निराश झाले आहेत. तक्रारी केल्यानंतरही तीस तास उलटून गेल्यानंतरही ॲपमध्ये सुधारणा झालेली नसल्यामुळं म्हाडाच्या आयटी सेलच्या कारभारावर नागरिकांकडून टीका होत आहे.