नवी दिल्ली : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी मॅडम कमिशनर या पुस्तकातून धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. पोलिसांच्या घरासाठीच्या जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय तत्कालीन पालकमंत्री दादांनी घेतला होता, असं म्हटल्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मीरा बोरवणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे.
मीरा बोरवणकर म्हणाल्या की, एक बिल्डर तुम्हाला माझ्या जागेमध्ये येरवडा पोलीस स्टेशन आहे. ही जागा उचला आणि मला द्या, अशी विनंती करतो. पोलिसांची जागा कुणाला देऊ नका, असे माझे मत होते. पोलिसांच्या घरांचा प्रॉब्लेम आहे, अधिकाऱ्यांना कार्यालय नाही, असे मी सांगितले. परंतु, पुस्तकात अजितदादांचं नाव कुठेही घेतलं नव्हते, पण ते तेव्हा पालकमंत्री होते. त्यांचे असे म्हणणे होते की ही प्रोसेस संपली आहे, तुम्ही हॅण्डओव्हर करा. आधीच्या कमिशनरनी का हॅण्डओव्हर केलं नाही, असा सवालही त्यांनी विचारला.
कुणी पुस्तक वाचलंच नाही, पुस्तक न वाचताच पुणे पोलिसांची जागा अजितदादांनी लिलाव केली, अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, ते तसे झालेच नाही. हे पुस्तक वर्षभरापूर्वी संपादनासाठी दिला होता. दोन महिन्यांपासून हे पुस्तक प्रिंटिंगला होते. त्यामुळे हे पुस्तक राजकीय नाही, असेही बोरवणकरांनी म्हंटले आहे.