मुंबई : महानगरात गोवरचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. यामध्ये काही बालकं दगावली आहेत. येत्या काळात गोवरचं संकट आणखी गडद होण्याची भीती निर्माण झाली आहे. मुंबई पाठोपाठ नाशिकमध्ये देखील गोवरचा शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्र्यांनी आज बैठक घेत प्रशासनास महत्वाच्या सूचना दिल्या. यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी लसीकरण वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती दिली.
तानाजी सावंत म्हणाले की, लसीकरण वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लसीचा पुरवठा प्रचंड आहे. आम्ही गाव-खेड्यात माहिती घेण्यासाठी आदेश दिले आहेत. आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू गोवरमुळे झाले आहेत. एक जणांच्या बाबत संभ्रम आहे. तो देखील मी स्वतः जाऊन व्हेरीफाय करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
मागच्या आठवड्यापासून साथ पसरली आहे. भिवंडी, मालेगाव आणि मुंबई हॉट-स्पॉट आहेत. मी अगोदरच सूचना दिल्या होत्या कशाप्रकारे काम केलं गेलं पाहिजे. 14 ते 20 तारखेपर्यंत पाहिले तर 14 तारखेला 185 केसेस होत्या. तर, आता कालच्या आकडेवारीनुसार 62 केसेस आहेत याचाच अर्थ असा की केसेस कमी होतं आहेत, असा दावा सावंतांनी केला आहे.
ज्यांचे मृत्यू झाले आहेत त्यांचे लसीकरण झाले नव्हते. यामध्ये 15 वर्षापेक्षा जास्त कोणी नाही. आम्ही 20 लाख घरापर्यंत पोहचलो आहोत आणि तपासणी सुरु आहे. 24 तास हॉट लाईन सुरु आहे, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, गोवर गंभीर होऊ शकतो ज्यात निमोनियासारखा आजार देखील बळावत रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गोवरचा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिकेकडून कंबर कसली आहे. ठिकठिकाणी लसीकरणाचे कॅम्प सुरु आहेत. काही प्रमाणात लसीकरणाविषयीची उदासीनता आणि विरोध देखील दिसून येतो, अशावेळी मौलवींची मदत घेत नागरिकांना आवाहन देखील करण्यात येत आहे. तर, उपचारासाठी पालिकांकडून अतिरिक्त वॉर्डची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.