वैभव बालकुंदे, लातूर | राज्य सरकारच्या ऐतिहासिक पगारवाढीच्या निर्णयानंतरही कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवरून संपावरच आहेत. या दरम्यान आंदोलनातून सेवेत येणार्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेतले जात आहेत, तर सेवेत न येणार्यांचे निलंबन केले जात आहे. त्यात लातूरात प्रसूती रजेवर असलेल्या महिला वाहकालाही निलंबित केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ शासनात विलीणीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात येत आहे. दबावतंत्राचा वापर करून कारवाईच सत्र सुरूच असताना प्रसूती रजेवर असलेल्या महिला वाहकालाही निलंबीत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूर तालुक्यातील मुरुड इथे राहणाऱ्या सारिका लाड या लातूर आगारात महिला वाहक म्हणून गेल्या 16 वर्षांपासून सेवा कार्यरत आहेत. दोन महिन्यापूर्वी त्यांनी रितसर अर्ज करीत प्रसूती रजा देण्यात आली होती. तरीदेखील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सारिका लाड यांची 25 दिवसापूर्वी प्रसूती झाली आहे. मात्र, गैरशिस्तपणाचा ठपका ठेवत एसटी महामंडळाने त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. त्यामुळे स्वतः सारिका लाड यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. प्रसूती रजा दिल्यानंतरही अशा पद्धतीचे निलंबनाचे आदेश ज्यांनी काढले आहेत त्यांच्यावरच कारवाई करण्याची मागणी वाहक सारिका लाड यांनी केली आहे.