मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणीत आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक घराबाहेर पडतांना पाहायला मिळाले. काही ठिकाणी ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेची तर काही ठिकाणी ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात सकाळी ६ वाजून ९ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे. याचवेळी हिंगोली आणि परभणीमध्ये देखील भूकंपचे धक्के जाणवले आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यात १९९३ नंतरचे सर्वात मोठे धक्के असल्याचे माहिती मिळत आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर पासून १५ किलोमीटरवर दाखवला जात आहे.
दरम्यान, अनेक ठिकाणी घरांची पडझड झाल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. तर, काँक्रीटच्या घरांना अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. दांडेगाव येथील अनेक सिमेंटच्या घरांना तडे गेले आहेत. तर, काही मातीची घर कोसळली आहेत. त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांचे नुकसान सुद्धा झाले आहे. ज्या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले त्या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी देखील तेथे पोहचले असून तेथील सर्व घटनेचा आढावा घेतला जात आहे.