मराठा आरक्षणाबाबत राज्य विधिमंडळाचं आज विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी हे विशेष अधिवेशन असणार आहे. हे एक दिवसीय विशेष अधिवेशन असणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणावर सविस्तर चर्चा होणार आहे.
अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून सकाळी 11 वाजता अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल बैठकीत मांडण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष अधिवेशनात सरकारनं काढलेल्या सगेसोयरेंच्या कुणबी नोंदी संदर्भातील अधिसूचनेचा मुद्दा येण्याची शक्यता कमी असल्याची माहिती मिळत आहे.
राज्यपालांचे अभिभाषण आणि अभिभाषणानंतर अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होईल. या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला मंजुरी मिळेल.