जालना : मराठा आरक्षणासंदर्भात ४ दिवसांचा वेळ दिला आहे. त्यात आज कॅबिनेट बैठकही झाली. तुम्ही निर्णय घेऊ शकत होतात. पण, अजून २ दिवस आहेत. सरकारला एक दिवसात अध्यादेश काढता येईल इतके रिक्षाभर पुरावे आता देतो. आता सरकारनं वेळ मागू नये, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असतानाही त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. राज्यपालांची परवानगी घेवून सरकारनं वटहूकूम काढावा, अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली.
आम्ही सरकारला स्वत:हून संधी दिली आहे. वेळ दिला आहे. सरकारचं शिष्टमंडळ आम्हाला भेटायला येईल अशी अपेक्षाही नाही, असंही जरांगे म्हणाले. तसंच आम्ही नाही तर सरकारनंच आम्हाला वेठीस धरलंय असून सामुहिक कट रचून आमच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकारच काम सरकारनं करायचं आहे आणि जनतेचं कामं मागणी करायचं आहे. तेव्हा मराठ्यांनी आणि ओबीसींनी याप्रकरणी समन्वयानं वागावं, अस सांगायलाही जरांगे विसरले नाही.
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. या उपोषणामुळे जरांगे पाटलांची तब्येत खूप खालावली आहे. मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना 2 सलाईन लावली आहेत. त्यामुळे त्यांच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली जात आहे. जरांगे पाटलांच्या कुटुंबियांनीदेखील याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तर या प्रकरणी सरकारकडे कोणाताच तोडगा काढला नसून विशेष अधिवेषनात या प्रकरणी केंद्र सरकारनं घटना दुरूस्ती करावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकार आणखी एक समिती गठीत करणार आहे. माजी न्यायमुर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती गठीत करणार असल्याची माहिती समजत आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात ही समिती काम करणार आहे.